मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच दिल्याचं प्रकरण सध्या चांगलंच वादात आहे. या प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानी सध्या पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणात आता आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत.
अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याकडे १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. धक्कादायक म्हणजे संपूर्ण कट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी आखण्यात आला असावा,असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करण्यासाठी अनिक्षाने त्यांचे काही बनावट व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप बनवलेल्या होत्या.
अनिक्षाने त्या सगळ्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप्स फेब्रुवारी महिन्यात अमृता फडणवीस यांना पाठवल्या आणि त्या डिलीट करण्यासाठी तिने त्यांच्याकडे दहा कोटींच्या खंडणीची मागणी केली. तसेच, त्यांनी खंडणी न दिल्यास संबंधित क्लिप्स व्हायरल करण्याची धमकी अमृता फडणवीसांनी तिने दिली होती, असा खुलासा पोलिसांनी न्यायालयात केला.
या प्रकरणामध्ये काही राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. पुढील तपासासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे अनिक्षाची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. पण कोर्टाने तिला २१ मार्चपर्यंतच कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
