गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. आताच्या घडीला महाराष्ट्रात कोरोनाचे सुमारे १७०० रुग्ण सक्रीय असल्याचे सांगितले जात आहे. तर तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शुक्रवारी राज्यात 343 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 194 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरातील असून पुण्यात 510 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मुंबई, ठाण्याचा क्रमांक आहे. राज्यात कोरोनाच्या तीन मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण 194 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 79,90, 824 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.16 टक्के इतकं झालं आहे. राज्यात तीन कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णाांची एकूण संख्या 81,41, 020इतकी झाली आहे.
पुण्यासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोर्डवर आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषधं घेतलं जाऊ शकतं पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं.
