मुंबई : वीर सावरकर यांच्यावर काँग्रेस कडून होत असलेल्या टीकेमुळे शिवसेनेची नेहमीच कोंडी होते. राहुल गांधी यांच्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सावरकरांचा मुद्दा काँग्रेसने काढल्याने अखेर शिवसेनेने काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आपलेचे तारे तोडू नका असा सल्ला काँग्रेसला देण्यात आला आहे.
काँग्रेस आणि प्रामुख्याने राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांवर माफीवीर म्हणून टीका केली जाते. शिवसेनेला यामुळे नेहमीच कानाकोंड व्हावं लागतं. यामुळे सामनातून काँग्रेसच्या नेत्यांना इशारा देण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, राहुल गांधींनी माफी मागितली नाही व ते बेडरपणे शिक्षेला सामोरे गेले. माफी मागायला ते काही सावरकर नाही, असे काँग्रेसवाले म्हणतात. अर्थात असे अकलेचे तारे तोडणाऱ्यांनीदेखील ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सावरकरांना इंग्रज सरकारने दोन जन्मठेपेच्या शिक्षा ठोठावल्या अशा प्रकारची शिक्षा ठोठावली जाणारे ते एकमेव क्रांतिकारक होते.
वीर सावरकरांना अंदमानच्या काळकोठडीत डांबलं आणि तिथून पुन्हा मायभूमीत परत येण्याची शक्यता नव्हती. राहुल गांधींना अपिलात जाण्याची आणि शिक्षेला स्थगिती देण्याची संधी कायद्याने मिळाली तशी सवलत सावरकरांसारख्या क्रांतिकारकांना त्यावेळी नव्हती. सावरकरांनी १० वर्षे काळेपाणी भोगल्यावर बाहेर पडण्याची धडपड सुरू केली व त्यांनी तशी धडपड करावी असं महात्मा गांधी सरदार पटेलांपासून सगळ्यांचंच म्हणणं होतं, असे म्हणत काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घातले आहे.
इंग्रजांनी सावरकरांना ५० वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. ती ते एक खतरनाक क्रांतिकारक देशभक्त होते म्हणून. बलाढ्य इंग्रज सरकारला वीर सावरकरांचे भय वाटत होते. म्हणूनच त्यांना पन्नास वर्षांसाठी अंदमानच्या काळकोठडीत नेऊन ठेवलं. त्यामुळे गांधी(सध्याचे) भक्तांनी मोदींच्या अंधभक्तांप्रमाणे वागू नये, असा सल्ला देत राहुल गांधी म्हणजे थोर देशभक्त नाहीत असेही शिवसेनेने म्हटले आहे.
