कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुणावली होती. ज्यानंतर राहुल गांधीची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशभरात भाजपविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.एकीकडे या निर्णयाविरोधात कॉंग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असताना राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे.
आशिष देशमुख म्हणाले की, २०१९ मध्ये त्यांच्याकडून चुकून काही शब्द निघाले असतील, तर मोठा ओबीसी समाज संतप्त झालेला पाहून राहुलजींनी नक्कीच माफी मागावी. ही आमची मागणी असेल. समाजाला चोर म्हणणे नक्कीच योग्य नाही. याआधीही राहुल यांनी दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवर माफी मागितली असून इथे ओबीसी समाजाचा मुद्दा आहे. राहुलजींनी माफी मागितली तर त्यांचा प्रतिमा अधिक उंचावेल ,आणि हा जो सगळा प्रकार सुरू आहे, तो काँग्रेसला शांत व्हायला मदत करेल.
‘चौकीदार चोर है’ च्या संदर्भातही आमच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये नाराजी व्यक्त केली होती.राहुल गांधींना न्यायालयात माफी मागावी लागली होती. पण तोपर्यंत २०१९ मध्ये काँग्रेसला फटका बसून चुकला होता. काही दिवसांत कर्नाटकात आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये निवडणुका आहेत, जिथे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. येत्या २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. या सर्व निवडणुकांत काँग्रेसने ओबीसी समाजाला आपलेसे करून घेण्याची गरज आहे.
