सुषमा अंधारे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात आक्रमक

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत. शिरसाठ यांच्याविरुद्ध त्यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली असून अब्रुनुकसानीचा दावाही करण्याच्या तयारीत आहेत.

सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेदरम्यान अनेकदा शिंदे गटातील आमदारांचा भाऊ म्हणून उल्लेख करतात. यावर टीका करताना आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली. ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. पण, तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे आता राज्यभरात स्थानिक पोलीस स्टेशनला उद्धव ठाकरे गटाकडून शिरसाठ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली जात आहे. मात्र पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाही आहे, असा आरोप होत आहे. त्यामुळे सुषमा अंधारेंनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून शिरसाठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका अंधारे यांनी घेतली आहे.