देशात कोरोना रुग्णांच्या संंख्येत मोठी वाढ; सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे 3 हजारांवर नावे रुग्ण

देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ३,०१६ रुग्ण आढळले. दैनंदिन रुग्णसंख्येचा गेल्या सहा महिन्यांतील हा उच्चांक आहे. गेल्या वर्षी २ ऑक्टोबरला दैनंदिन रुग्णसंख्या ३,३७५ इतकी नोंदविण्यात आली होती. त्यानंतर त्यात घट होत गेली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढ होऊ लागली असून, बाधितांचे दैनंदिन प्रमाण २.७३ टक्क्यांवर गेले आहे. गेल्या आठवड्यापर्यंत देशात दररोज सरासरी 1,500 लोकांना कोरोना संसर्ग होत होता. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात कोरोना व्हायरसच्या 3,016 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 2 ऑक्टोबर 2022 रोजी कोरोनाचे 3,375 रुग्ण आढळले होते.

गेल्या 24 तासांत देशात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये गोवा-गुजरातमधील प्रत्येकी एक आणि केरळमधील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5.30 लाख लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 2.61 टक्के नोंदवण्यात आला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 1.91 टक्के नोंदवण्यात आला आहे. देशात कोरोनाचे एकूण 4.47 कोटी रुग्ण आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी राबवलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 220.64 कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्राने काही राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दरात वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यावर तातडीने नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले असून प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे