उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काउंटर, यूपी पोलिसांच्या टास्क फोर्सची कामगिरी

कुख्यात गँगस्टर अतीक अहमदच्या मुलाचं आणि आणखी एका शूटरचं एन्काऊंटर झालंय. असद असं अतीकच्या मुलाचं नाव आहे. उमेश पाल खून प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. याच प्रकरणात गुलाम नावाचा शूटर सह-आरोपी होता. त्याचाही एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सनं झाशीमध्ये ही कारवाई केली. या दोघांकडून परदेशी बनावटीची शस्त्रही हस्तगत करण्यात आली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून उमेश पाल हत्याप्रकरणात या दोघांचा तपास सुरु होता. असद आणि गुलाम यांना पकडण्यासाठी ५ लाखांचे इनामही जाहीर करण्यात आले होते. उत्तर प्रदेश पोलिसांकडून या दोघांचा कसून शोध सुरु होता. अखेर गुरुवारी सकाळी हे दोघेजण झाशीत असल्याचे पोलिसांनी कळाले. त्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली. यावेळी झालेल्या चकमकीत असद आणि गुलाम यांचा मृत्यू झाला. या दोघांकडूनही परदेशी बनावटीची पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांकडून सध्या असदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर असदचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवला जाईल.

गेल्याच महिन्यात २००७ च्या उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक अहमद आणि आणखी दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. २००५ मध्ये उत्तर प्रदेशातील बसपा आमदार राजू पाल यांची हत्या झाली होती. याप्रकरणात उमेश पाल हे प्रमुख साक्षीदार होते. आज अतिक अहमद याला न्यायालयीन सुनावणीसाठी प्रयागराजला आणण्यात आले. यावेळी अतिकला आपला मुलगा पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाल्याचे कळाले. ही बातमी कानावर पडताच अतिकला कोर्टातच रडू कोसळले. आज न्यायालयीन सुनावणीसाठी अतिकला गुजरातच्या साबरमती कारागृहातून प्रयागराजला आणण्यात आले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया देताना यूपी एसटीएफचे कौतुक केले आहे. मुख्य सचिव संजय प्रसाद यांनी या एन्काऊंटरची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या एन्काऊंटरनंतर मुख्यमंत्र्यांसमोर या संदर्भातील संपूर्ण रिपोर्ट सादर केला आहे. उमेश पाल हत्याकांड प्रकरणानंतर असद फरार होता.