नगरविकास खात्याचा शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व त्यापाठोपाठ अजित पवार यांच्या शहरांनी टॉप तीनमध्ये स्थान मिळवले आहे. म्हणजेच या स्पर्धेत नागपूर महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर दुसऱ्या स्थानी ठाणे व तिसऱ्या स्थानावर पिंपरी चिंचवड महापालिका आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.
नगरविकास दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा निकाल जाहीर करण्यात आलाय. मात्र हा निकाल सध्या चर्चेत आलाय. या निकालाच्या क्रमवारीमुळे सध्या या निकालामध्ये भविष्यात होऊ शकणाऱ्या राजकीय घडामोडीचे संकेत दडले आहेत की काय, असा प्रस्न आता उपस्थित होऊ लागलाय.
राष्ट्रवादी नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उत आला होता. ते प्रकरण आता शांत झालं आहे. ते राष्ट्रवादी सोडून, 40 एक आमदार घेऊन भाजपमध्ये जाणार आणि मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यावर ब्रेक स्वत: अजित पवार यांनीच लावले आहे. त्यामुळे ते काही भाजपमध्ये जाणार नाहीत हे नक्की झालं आहे. एकीकडे त्यांनी स्पष्टीकरण दिलं असतानाही आता शहर सौंदर्यीकरण स्पर्धेच्या निकालाच्या निमित्ताने अजित पवारांच्या भाजप प्रवेशावर पुन्हा एकदा तर्क वितर्क लावले जात आहेत.
