शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात दोन तास बंद दाराआड चर्चा

मुंबई : काँग्रेसकडून उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हल्लाबोल सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात दोन तास बंद दाराआड चर्चा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अदानी पोहोचले. त्यांनी पवारांशी दोन तास बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेमध्ये स्वतः पवार आणि अदानी यांच्याशिवाय तिसरे कोणीही नव्हते, अशा बातम्या माध्यमांना दिल्या आहेत. या चर्चेतले कुठलेच तपशील बाहेर आलेले नाहीत.

शरद पवार आणि अदानी यांचे संबंध खूप जुने आहेत. आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात त्यांनी लिहिले आहे की “गौतम अदानी या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे. कमालीचा कष्टाळू आणि साधा ! शून्यातून त्यानं आपलं आजचं साम्राज्य उभं केलं आहे. लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली. यानंतर काही छोटे व्यवसाय सुरू करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले. मग तो हिऱ्यांच्या व्यवसायात पडला. तिथेही पैसे मिळत होते, पण गौतम यांना त्याच्यात रस पायाभूत उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. यामधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला.

राहुल गांधी आणि काँग्रेसने संपूर्ण ताकदीनिशी अदानी मुद्दा देशभर पेटविला असताना पवारांनी एनडीटीव्हीला मुलाखत देऊन अदानींची बाजू उचलून धरली होती. गौतम अदानी यांची जेपीसी चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. काँग्रेससह ठाकरे गटाकडून मागणी केली जात आहे. शरद पवार यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. गौतम अदानी यांची न्यायालयीन चौकशी व्हावी असे ते म्हणाले. त्यानंतर संपूर्ण राज्यांमध्ये शरद पवारांनी एक प्रकारे गौतम आदमी यांना क्लीन चीट दिल्याची भावना निर्माण झाली आहे. शरद पवारांच्या राजकीय भूमिकेविषयी विरोधी पक्षांच्या गोटामध्ये पूर्ण संशयाचे वातावरण तयार झाले आहे.