आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स सामना; आरसीबीला विजय महत्त्वाचा

आयपीएल 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीतल सहाव्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. आज 27 वा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. आरसीबीला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे.

त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ या सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर गेल्या सामन्यात विजय मिळवलेला पंजाब किंग्ज संघ हा सामना जिंकून आपली स्थिती आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

दरम्यान हा सामना सुरू होण्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार शिखर धवन हा या हंगामात जोरदार फॉर्ममध्ये आहे. मात्र ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेल्या शिखर धवनला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. जोरदार फॉर्ममध्ये असूनही दुखापतीमुळे त्याला लखनऊ संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातून बाहेर राहावे लागले होते. अजूनही त्याच्या फिटनेसबाबत कुठलीही माहिती समोर आली नाहीये. त्यामुळे आजही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

इंडियन प्रीमियर लीग मध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांमध्ये आतापर्यंत 30 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये पंजाब संघाचं पारड जड दिसून आलं आहे. पंजाब संघाने 30 सामन्यांपैकी 17 सामने जिंकले आहेत, आरसीबीला फक्त 13 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.