अमित शहा मुंबईतील विलेपार्लेतील कार्यक्रमाला हजर राहणार; मुंबईत ५ हजार ठिकाणी ‘मन की बात’चे आयोजन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाची शंभरी पूर्ण होणार आहे. यानिमित्त मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. विलेपार्लेतील ‘मन की बात’ कार्यक्रम लाईव्ह प्रसारित केला जाणार असून याच कार्यक्रमाला अमित शाह हजेरी लावणार आहेत. मन की बात कार्यक्रमाचा 100 व्या कार्यक्रमासाठी देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. मुंबईत गेट वे ॲाफ इंडियाच्या प्रांगणातही शालेय विद्यार्थ्यांसाठी “मन की बात” या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आलं आहे. गेट वे ॲाफ इंडियाच्या वास्तूवर लेझर शो द्वारे “मन की बात” कार्यक्रमाचे काही भागांचे सादरीकरण दाखवण्यात येत आहे.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सर्वेक्षणानुसार मन की बात १०० कोटी श्रोत्यांपर्यंत पोचली आहे आणि २३ कोटी नियमित श्रोते आहेत. देशभरातील वेगवेगळय़ा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची माहिती मागवून त्यांच्या कार्याचा सन्मान देखील या माध्यमातून करण्यात आला आहे. देशासाठी काम करणाऱ्या पण प्रसिध्दीपासून लांब असलेल्या अनेकांसाठी हे हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे खासगी भेटीसाठी मुंबईत येणार आहेत. ते विलेपार्ले येथील केंद्रात उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 पासून सातत्यानं ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या अंतिम रविवारी जनतेशी संवाद साधतात. आज मन की बात शंभरीत पदार्पण करीत आहे. त्यामुळे त्याची जय्यत तयारी सुरू आहे. देशवासियांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या कल्पना, समस्या आणि मतं ऐकणं या उद्देशानं मोदींनी ‘मन की बात’ हा कार्यक्रम सुरु केला होता. आज या मन की बातची शंभरी पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मुंबईसह उपनगरातल्या 5 हजारांहून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.