आमचा पक्ष हा अरबी समुद्रासारखा आहे; सगळ्यांना सामावून घेतो – चंद्रशेखर बावनकुळे

भारतीय जनता पक्षात सातत्याने विविध नेत्यांचं इन्कमिंग सुरू असतं. त्यावरून भाजपावर नेहमी टीका होत असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नुकतेच एका ठिकाणी म्हणाले, सध्या आयाराम गयारामांना कुठे बसवायचं हा भाजपासमोरचा मोठा प्रश्न आहे. जयंत पाटलांच्या या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बावनकुळे म्हणाले, आमचा पक्ष हा अरबी समुद्रासारखा आहे, भारतीय जनता पक्ष ह महासागर आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या महासागरात कितीही मोठं नेतृत्व आलं किंवा लहान नेतृत्व जरी आलं किंवा कोणत्याही पक्षातून कोणताही नेता आला तरी आमच्याकडे खूप जागा आहे. कारण आम्ही एका विचारधारेतून काम करणारे लोक आहोत. आमच्याकडे खूप शाखा आहेत. समाजातील शेवटच्या व्यक्तीला केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या शाखा आमच्याकडे आहेत. आगामी काळात आम्हाला विधानसभेच्या २८८ जागा युतीत लढायच्या आहेत. लोकसभेच्या ४८ जागा लढायच्या आहेत.

आम्ही एका विचारधारेने काम करणारे पदाधिकारी आहोत. आमच्याकडे खुप विंग्स आहे. समाजाच्या शेवटच्या बिंदूला समोर ठेवून काम करणारा आमचा पक्ष आहे. आमच्याकडे जवळपास ३५ विंग्स आहेत. तसेच ९ मोठे मोर्चे आहे. त्यामुळे पक्षामध्ये कोणीही आलं तरी त्याच्या क्षमतेप्रमाणे आम्ही त्यांना काम देतो. म्हणून ज्यांना भाजपमध्ये यायचं आहे, त्यांना माझी विनंती आहे, त्यांनी भाजपमध्ये यावं आम्ही त्यांना महासागरासारखं सामावून घेवू, असे म्हणत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना खुली ऑफरच दिली आहे.