आगामी लोकसभा विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भेटी गाठीचे सत्र सुरु आहे. दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक ट्विट केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं आहे की, काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली.
याचबरोबर राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आल्याचे शिंदे यांनी ट्विट केले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत आहोत. रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार, असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
