जगभरात 14 जून हा दिवस ‘जागतिक रक्तदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रक्तदानाची गरज, त्याचं महत्त्व आणि फायदे याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच कोणत्याही मोबदल्याशिवाय रक्तदान करुन रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या नागरिकांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली जाते.
‘जागतिक रक्तदान दिना’ची थीम दरवर्षी बदलत असते. 2023 या वर्षीच्या ‘जागतिक रक्तदान दिना’ची थीम“रक्तदान आणि प्लाझ्मा दान करा, वारंवार करा, जीवनदान द्या !” अशी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, यंदाची थीम ही ज्या रुग्णांना आयुष्यभर रक्ताची गरज असते, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करते. अशावेळी रक्त किंवा प्लाझ्मा दान करुन प्रत्येक व्यक्ती आपली मोलाची भूमिका अधोरेखित करू शकते. नियमितपणे रक्तदान आणि प्लाझ्मा दान करण्याचं कर्तव्य, भवितव्य व महत्त्वही त्यामुळे अधोरेखित होतं. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी रक्त आणि रक्तातील घटकांचा सुरक्षित तसंच सातत्यपूर्ण पुरवठा व्हावा, ते कायम उपलब्ध असावेत यासाठी रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन आवश्यक आहे, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
पहिला जागतिक रक्तदान दिन मर्यादित स्वरुपात 2004 मध्ये साजरा करण्यात आला. पुढे 2005 मध्ये, 58 व्या जागतिक आरोग्य संमेलनादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून जगभरात दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस ‘जागतिक रक्तदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. 14 जून हा दिवस ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टेनर यांचा जन्मदिवस आहे. त्यांना आधुनिक रक्त संक्रमण प्रक्रियेचं ‘जनक’ मानलं जातं. कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगट प्रणालीची ओळख जगाला करून दिली. त्यांना रक्तगटांच्या शोधासाठी 1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. लँडस्टेनर हे मानवी रक्ताचे ए, बी, एबी आणि ओ या गटांमध्ये वर्गीकरण करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांच्या या कार्यामुळे समान रक्तगटाच्या लोकांमध्ये रक्त संक्रमणाची प्रथा सुरू झाली.
रक्तदानाला नेहमीच महादान म्हटले जाते. रक्तदान केल्याने तुम्ही केवळ इतरांचे प्राण वाचवत नाही तर तुमच्या आरोग्यालाही फायदा होतो. रक्तदानाचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया त्याचे फायदेरक्तदान केल्यानंतर काही लोकांना चक्कर येते किंवा अशक्तपणा जाणवतो. अशा परिस्थितीत रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर काय खावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. रक्तदान करण्यापूर्वी किंवा रक्तदानादरम्यान रक्तदात्यानं उपवास केलेला नसावा. रक्तदानापूर्वी कमीतकमी 4 तास अगोदर त्यानं जेवण केलेलं असावं. तसंच रक्तदात्यानं रक्तदानापूर्वी दारू प्यायलेली नसावी, असं राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितलं आहे. रक्तदान करण्यापूर्वी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसंच रक्तदान करण्यापूर्वी तुम्ही लोहयुक्त पदार्थ जसे चिकन, अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या, रताळे, बीन्स, बीट, ब्रोकोली, इत्यादी हिरव्या भाज्या खाऊ शकता. रक्तदान केल्यानंतर तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश करू शकता. फळांच्या सेवनानं अशक्तपणा आणि थकवा दूर होण्यास मदत होते.
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या दाव्यानुसार, रक्तदानाचा उद्देश केवळ गरजू लोकांना रक्त उपलब्ध करून देणं हा नाही. तर याचे इतरही अनेक फायदे आहेत. रक्तदानामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रक्तदान केल्याने शरिरातील विशेषत: पुरुषांच्या शरिरातील लोहाची पातळी विशिष्ट मर्यादेपर्यंत राहते आणि यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. नियमित रक्तदान केल्यास हृदयविकाराचा झटकाही बऱ्याच अंशी टाळता येतो. याशिवाय रक्तदान केल्याने नवीन रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया गतिमान होते.
