व्लादिमीर पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॅन, मेक इन इंडियाचे केले कौतुक

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार कौतुक केले आहे. यासोबतच पुतिन यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे कौतुक करत पंतप्रधान मोदी यांना आपले खास मित्र म्हटलं आहे. 29 जून रोजी मॉस्को येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना पुतिन यांनी हे विधान केले आहे. माझे मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी मेक इन इंडिया ही संकल्पना सुरू केली होती ज्याचे खूप चांगले परिणाम पाहायला मिळाले आहेत, असे व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे.

व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’चे कौतुक केले आहे. मेक इन इंडियाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम झाल्याचे ते म्हणाले. रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी रशियातील देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियाचे उदाहरण झाले आहे. यासोबतच पुतिन यांनी स्थानिक उत्पादन विकसित केल्याबद्दल आणि विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एक प्रभावी मॉडेल तयार केल्याबद्दल भारताचे कौतुक केले. आपली उत्पादने आधुनिक गुणांसह अधिक सोयीस्कर बनविण्याबाबत विचार करण्याची गरज आहे यावर पुतिन यांनी भर दिला.

अमेरिकेच्या दौऱ्यापूर्वीच रशियाने भारताला आपला खास मित्र असल्याचे सांगितले होते. भारत अजूनही आमचा विश्वासू मित्र आहे, या भेटीचा आमच्या मैत्रीवर फारसा परिणाम होणार नाही, असे रशियन राजदूत म्हणाले होते. भारतासोबतची मैत्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवू. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.या भेटीचा सर्वाधिक परिणाम रशियावर होणार असल्याचे बोलले जात होते. कारण अमेरिकेचे रशियाशी संबंध चांगले नाहीत. युक्रेन युद्धाबाबत दोघांमधील तणाव खूप वाढला आहे. युक्रेनच्या युद्धात अमेरिका पाठिंबा देत आहे, त्यामुळे रशियामध्ये तणाव आहे. रशियाशी युद्ध लढण्यासाठी अमेरिकेने युक्रेनला मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे.