दिमतीला ठेवला शापित दरबारी, अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी; कवितेतून आशिष शेलारांची संजय राऊतांवर खोचक टीका

जित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणानंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. अजित पवार यांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 आमदार घरी जाणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे. दिमतीला ठेवला शापित दरबारी, अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी, असं शेलार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अहंकारी राजा आणि पुत्र विलासी
दिमतीला ठेवला शापित दरबारी
अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी

अहंकारी राजाला आवडे खोटी स्तुती भारी
संजय मग बिनधास्त दुसऱ्याचे बाप काढी
काय ती रोज सुरू असायची सरबराई!

बघा काय अवकळा आली
गेली गेली सत्ता गेली, पक्ष ही गेला
अहंकारी राजा, विलासी पुत्र आणि संजय तेवढा उरला

झाला मोह “जाणत्या राजांना” याच संजयाचा
अखेर बसला फटका त्यांनाही शापित दरबाऱ्याचा

आम्ही सांगतं होतो वारंवार यांना
आवरा कि हो, या तुमच्या विश्वविख्यातांना

आता बांधा पुतळा या तुमच्या विश्वविख्यातांचा
यापेक्षा काय सन्मान करणार या शापित दरबाऱ्यांचा!

संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. यावरून अनेक नेते संजय राऊतांना हेरतात. तसंच, संजय राऊत यांच्या बडबड्या वृत्तीमुळेच शिवसेनेत फुट पडली असा दावाही अनेकांनी केला आहे. तसंच, महाविकास आघाडी सरकारच्या काळातही संजय राऊत सतत हस्तक्षेप करत असल्याने हे सरकार कोसळले असाही आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जातो. त्यातच, संजय राऊतांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हस्तक्षेप वाढल्याने राष्ट्रवादी फुटली अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात केली जातेय. भाजपानेही असाच दावा केला आहे. यावरून आशिष शेलारांनी आता कवितेच्या माध्यमातूनच त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे.

दरम्यान, काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या या शपथविधीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी आत्तापर्यंत पाच वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम मोडला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.