राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.याच पार्श्वभूमीवर आता नवी माहिती समोर येत आहे. सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देवगिरीवर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात अजित पवार या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे. अजित पवार हे अधिकृत पत्र काढून त्याबाबत घोषणा करतील, असं सांगण्यात येतंय.
अजित पवार यांच्या गटाच्या प्रतोदचं नाव देखील ठरलं आहे. अनिल पाटील हे अजित पवार गटाचे प्रतोद असणार आहेत. स्वतः अनिल पवारांनी याबाबत माहिती दिली आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 9 आमदारांच्या अपात्रेची याचिका दाखल केली आहे. जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेतील मुद्द्यांचा अभ्यास करून मी योग्य तो निर्णय घेईल असं, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले आहे.
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी सुनिल तटकरेंची पक्षाच्या राष्ट्रीय खजिनदारपदी निवड करण्यात आली होती. स्वत: शरद पवारांनी तटकरे यांची नियुक्ती केली होती. याचवेळी शरद पवारांनी पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. शिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांची राष्ट्रीय खजिनदार पदी नियुक्ती जाहीर केली होती.
