‘महाराष्ट्राचा महाचाणक्य’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी उपाधी, नागपुरात झळकले बॅनर्स

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं आहे. अजित पवार यांनी भाजप, शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान कालच्या राष्ट्रवादीमध्ये झालेल्या भूकंपानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरकरांनी नवी उपाधी दिली आहे. नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे पोस्टर लागले आहेत.

नागपूर जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस यांना वेगळी राजकीय उपाधी दिलेलं बॅनर लावण्यात आलं आहे. ‘महाराष्ट्राचा महाचाणक्य’ म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग्ज नागपूरमध्ये लावण्यात आले आहेत. कालच्या राजकीय भुकंपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही नवी राजकीय उपाधी देण्यात आली आहे.
भाजपचे नेते आणि बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी हे बॅनर लावले आहे. यावर ‘महाराष्ट्राचा महाचाणक्य’ असा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करण्यात आला आहे. फडणवीसांच्या शेजारी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. होर्डिंग्जवर कमळ, घड्याळ आणि धणुष्यबाण अशा तिन्ही पक्षांचे चिन्ह एकत्र लावण्यात आलेत.

नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्राच्या हितासाठी दोन पक्षांना भाजपसोबत आणणाऱ्या देवेंद्रभाऊ तुमच्या चाणक्यनितीला सलाम’ असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे.विशेष म्हणजे होर्डिंग्जवर देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो देखील छापण्यात आले आहेत.

राज्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीस हे दिल्लीच्या राजकारणात जातील, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात फडणवीस यांना स्थान मिळेल, असा अंदाजही बांधला गेला.पण, पक्ष संघटना, सरकार आणि प्रशासनावर पकड ठेवलेले फडणवीस यांचीही केंद्राऐवजी राज्यात काम करण्याला पसंती असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे तूर्त तरी फडणवीस यांचे प्रमोशन होणार नसून, ते या सरकारमध्ये मजबुतीने काम करतील. ज्यामुळे पुढील निवडणुकांत भाजपला फायदा होण्याची आशा आहे.