मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज ठाकरे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात येतो का? ते पाहणं महत्त्वाचं होतं. असं असताना आज राज ठाकरे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची ही पूर्वनियोजित भेट आहे, अशी माहिती समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडेही वर्षावर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात खळबळ उडवणाऱ्या घटना समोर येत होत्या.दोन दिवसांपासून मनसे- ठाकरे गट युती होणार असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चां रंगू लागल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर राज्यातील राजकारण आता अधिकच अस्थिर झाल्याचं दिसून येत आहे. या भेटीमुळे काही नव्या राजकीय समिकरणांची देखील चर्चा केली जात आहे.