शरद पवारांच्या वयावरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, आमच्या त्यांना शुभेच्छा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अलीकडेच आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. खरं तर गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लक्षणीय होती. विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला.

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करून कार्यकर्ते सहानूभूती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, असे फडणीस म्हणाले.आमच्या त्यांना शुभेच्छा, त्यांना शंभर वर्ष आयुष्य लाभो, त्यांना जोपर्यंत राजकारण करायचे तेवढे त्यांना करायला मिळो, अशा शुभेच्छा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिल्या. काही लोकांना असे वाटते की, 83 वर्षाचा उल्लेख करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पण त्याकडे लक्ष देत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना शिवसेनेतील पक्ष प्रवेशावेळी तु्म्ही इथे कसे काय? असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी उत्तर दिले. ते म्हणाले, शिवसेना आणि भाजप ही एक भावनिक युती आहे. नीलम ताई आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत म्हणूनच मी त्यांच्या पक्षप्रवेशावेळ येथे उपस्थित आहे. त्यांनी दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश केला नसून हिंदुत्वाला पुढे नेत असलेल्या पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान बुधवारी झालेल्या सभेत अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा दाखला देत तुम्ही थांबणार आहेत की नाही असा प्रश्न विचारला. यावर काल शरद पवारांनी वयावर प्रश्न विचारणाऱ्या अजित पवारांना प्रत्युत्तर देताना, मी अजुनही कार्यक्षम आहे. मग ८२ काय आणि ९२ काय मला फरक पडत नाही,असं उत्तर दिलं आहे. या राष्ट्रवादी पक्षातील बंडानंतर शरद पवार गटाकडून ८३ वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात अशा स्वरूपाच्या जाहिरात देखील केली जात आहे.