शिवसेना ठाकरे गटाने आज लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात 17 जागांवरचे उमेदवार जाहीर केले आहेत. यात सांगलीच्या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. यावरून महाविकास आघाडीत नाराजी पाहायला मिळतेय. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते वरिष्ठांना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. सांगली लोकसभा मतदार संघाचा तिढा दिल्लीच्या दारी आल्याचं पाहायला मिळतंय. विश्वजित कदम आणि सांगली काँग्रेसचं शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झालंय. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन सध्या महाविकास आघाडीत नाराजी सुरु आहे. कारण उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय. मात्र, सांगलीची जागा काँग्रेसचं लढवणार असल्याचा पवित्रा काँग्रेस नेत्यांनी घेतलाय. याच मुद्यावरुन आज काँग्रसचे शिष्टमंडळ सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगली ही परंपरागत काँग्रेसची जागा असल्याने ठाकरे शिवसेनेने उमेदवार कसा जाहीर केला असा सवाल करत कोणत्याही स्थितीत सांगलीमध्ये काँग्रेसचाच उमेदवार असेल असे सांगितले. तर याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतील वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असून या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे
विशाल पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते तयारी करत आहेत. 2019 ची लोकसभा निवडणूक देखील त्यांनी लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, विशाल पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केली आहे.सांगलीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.थोरात म्हणाले आघाडीत काही जागांवर चर्चा सुरु आहे,आघाडी धर्म पाळणे सर्वांची जबाबदारी असल्याचं सर्वांची जबाबदारी असल्याचं थोरात म्हणाले,अशा प्रकारे चर्चा सुरु असताना जागा जाहीर कारण योग्य नाही,आमचा आजही भिवंडी आणि सांगलीच्या जागेसाठी आग्रह असून ठाकरेंनी याचा फेरविचार करावा असंही थोरात म्हणाले.
