महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीबरोबर सातत्याने बैठकींचं सत्र सुरु असतानाच आज अचानक वंचित बहुजन आघाडीने मविआला झटका दिला, स्वतंत्र लढण्याची घोषणा करत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मंगळवारी रात्री प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भातील सविस्तर माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली.
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. इतकच नाही, प्रकाश आंबडेकर यांनी काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी त्यांनी काही जागांची मागणी केली होती. पण मविआकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. संजय राऊत यांनी मविआला चार जागा देण्याची तयारी दर्शवली होती. अखेरचा प्रयत्न म्हणून वंचित बहुजन आघाडीला एक जागा वाढवून दिली. पण अखेर प्रकाश आंबेडकर यांनी आपला एकला चलो रे चा मार्ग पत्करला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. आम्ही ओबीसी, जैन, मुस्लीम उमेदवार देणार आहोत. गरीब उमेदवारांना तिकीट दिले जाईल.जरांगे पाटील यांचा फॅक्टर लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यांच्या संघटनेसोबत आम्ही सहयोग करणार आहोत. त्यांनी ३० तारखेपर्यंत थांबा असं सांगितलं आहे, असं आंबेडकर म्हणाले. याशिवाय वंचितकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे वंचितने मविआसोबत संबंध तोडल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी महासंघाशी युती जाहीर करत मविआवर टीका केली. यावेळी त्यांनी आठ जागांवर उमेदवारही जाहीर केले. भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिमसाठी आंबेडकरांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. ओबीसी, दलित, जैन समाजाला अधिकाधिक संधी देण्याचा मानस आंबेडकरांनी बोलून दाखवला.
मविआमध्ये सर्वात आधी उद्धव ठाकरे गटाने प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण नंतर उद्धव ठाकरे गटाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही, अशी खंत प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवली. प्रकाश आंबेडकर मविआच्या बैठकीला हजेरी लावायचे, त्यावेळी सुद्धा त्यांची अस्वस्थतता दिसून आली होती. त्यांच्या वक्तव्यावरुन खरोखरच ते मंविआसोबत जातील का? हा प्रश्न विचारला जायचा. आज या प्रश्नाच उत्तर मिळालं आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीतील उमेदवार
चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अकोला : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळूंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंग पवार
नागपूर : काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा
सांगली: प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार
