गेल्या तीन दिवसांपासून घाटकोपर येथे एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून फलकाखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत होता. ही शोध मोहीम गुरुवारी सकाळपर्यंत सुरू होती. मात्र हे मदतकार्य गुरुवारी सकाळी बंद करण्यात आले असून सध्या केवळ ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
घाटकोपरमधील महाकाय फलक सोमवारी दुपारी ४.१५ च्या सुमारास पेट्रोल पंपावर कोसळल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, बीपीसीएल कर्मचारी आणि मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत मंगळवारी सकाळपर्यंत एकूण १४ जणांचा मृत्यू आणि ७८ जण जखमी झाले होते. शोध मोहिमेअंतर्गत बुधवारी आणखी दोघांचा मृतदेह सापडला. त्यामुळे मृतांची संख्या १६ वर पोहोचली.
होर्डिंग लावलेली जागा रेल्वे पोलिसांची होती. बेकायदा आणि महाकाय होर्डिंग लावायला रेल्वे पोलिसांनीच परवानगी दिली होती. हे बेकायदा काम करणारा महाभाग म्हणजे लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालीद. सगळे नियम धाब्यावर बसवून या कैसर महाशयांनी इगो मिडीया प्रायव्हेट लिमिटेडला 10 वर्षांच्या काळासाठी होर्डिंग लावायला परवानगी दिली होती.
मुंबईत घाटकोपरमध्ये झालेल्या घटनेनंतर पुणे, नाशिक आणि नागपूरसारख्या शहरातदेखील अशा घटनांचा मोठा झोका आहे. त्यात अवकाळी आणि वादली पावसाने अनेकदा तिन्ही शहरात मोठ्या आणि किरकोळ घटना घडल्या आहे. या घटना घडू नये, यासाठी तिन्ही शहरात खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात अनधिकृत होर्डिग्सवर थेट कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर नागपुरात दोन विशेष पथक तयार करून शहरातील सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून त्यांची सुरक्षितता तपासली जात आहे.
