राज ठाकरेंची मराठीचा पुरस्कर्ता म्हणत स्तुती तर आयतोबा म्हणत शिवसेनेकडून उध्दव ठाकरेंची खिल्ली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दोन भावांतील एक जण प्रबोधक असून, दुसरा प्रक्षोभक आहे. एक मराठी प्रेमी तर दुसरा खुर्चीप्रेमी. एक मराठीचा पुरस्कर्ता तर दुसरा तिरस्कर्ता आहे, असे म्हणत आयतोबा म्हणत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उध्दव ठाकरेंची खिल्ली उडविली आहे. ( Raj Thackeray hailed as Marathis saviour while Shiv Sena mocks Uddhav Thackeray as a mere Ayatobaa)
राज ठाकरे व उद्धव ठाकरे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी व हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात मिळालेल्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी तब्बल 18 वर्षांनंतर आज एकत्र आले. या मेळाव्याद्वारे राज व उद्धव यांनी आपली भावी राजकीय वाटचाल एकत्र करण्याचे संकेत दिलेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने एका कवितेद्वारे त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेने केलेल्या कवितेत म्हटले आहे..

एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक

एक उजवा, दुसरा डावा

एक धाकला असून थोरला दुसरा थोरला असून धाकला

एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी

एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड!

एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता

एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा

एकाचा मराठीचा वसा दुसऱा भरतोय खिसा

एकाचा स्वतंत्र सवतासुभा दुसरा नुसताच आयतोबा!

 

शिवसेनेच्या नेत्यांनीही या मेळाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज ठाकरेंवर स्तुतीसुमने उधळली आहेत तर उध्दव ठाकरेंच्या भाषणाचे वाभाडे काढले आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे की, आजच्या मराठी अस्मिता मेळाव्यात राज ठाकरेजीं चे दमदार आणि प्रभावी भाषण झाले. बाकी उद्धटरावांची नेहमी प्रमाणे रडारड आणि टोमणेबाजी जोरदार सुरु होती.एकदम रटाळ आणि कंटाळवाणे भाषण. मूळ नाही की शेंडा नाही आणि अजेंडा काय होता? हे देवच जाणे.टोमणेसम्राटांचे भाषण पूर्णपणे राजकीय . मुंबईची सत्ता मिळवण्यासाठीचा खटाटोपच दिसत होता . राजला सोबत घेतलं नाही तर आपलं काही खरं नाही हेच त्यांच्या भाषणातून दिसलं …