विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरात गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळी ९.३० वाजता सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख १७ रस्ते सकाळी सात वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहतील.सहा सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पुढील ४८ तास शहरात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी राहील.
( 17 major roads closed for traffic in Pune for immersion procession)
शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी याबाबत आदेश काढून पर्यायी मार्ग आणि पार्किंगची व्यवस्था निश्चित केली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, सकाळी दहा वाजल्यापासून बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, केळकर रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, दुपारी बारानंतर लालबहादूर शास्त्री रस्ता, सायंकाळी चार वाजल्यापासून जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक), फर्ग्युसन रस्ता (गोपाळ कृष्ण गोखले रस्ता), भांडारकर रस्ता, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता तसेच, सकाळी नऊ वाजल्यापासून बगाडे रस्ता, गुरूनानक रस्ता आदी मार्गांवर मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक बंद राहील.
